मारुती बावडे
अक्कलकोट : एकीकडे जागतिक महामारी आणि कोरोनाचे वातावरण त्यातच स्त्रीभ्रूण हत्या करून मुलींचे प्रमाण कमी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.परंतु अक्कलकोट तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे.
आयसीडीएसच्या विविध माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर वाढला असून तो १ हजार मुलांच्या तुलनेत १ हजार ४५ असा झाला आहे. यावरून शासनाने सुरू केलेल्या बेटी बचाव, बेटी पढाओ,सुकन्या योजना
या सारख्या शासनाच्या योजनांचा ग्रामीण भागात चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
अक्कलकोट तालुक्यात अनेक वर्षापासून मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण अधिक
दिसून येत होते. महिला बालविकास
प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कोरोना च्या महामारी मध्ये देखील स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन केले गेले आहे व स्त्रीभ्रूण हत्या होऊ दिली गेली नाही.ग्रामीण भागात गरोदर मातेवर नेहमी अंगणवाडी सेविका व सुपरवायझर मार्फत घरोघरी भेट देऊन गरोदर मातेस व कुटुंबाला समुपदेशन करण्यात आले. त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले.
योग्य आहार आणि आरोग्य या विषयी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यात २०१९ मध्ये मुलींचे प्रमाण हजारी ९७२ होते.२०२० मध्ये ९६३ होते.तर एप्रिल २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन १ हजार मुलामागे आज घडीला मुली या ४५ जास्त दिसून आल्या आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट बालविकास प्रकल्प कार्यालय सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ० ते ६ वयोगटातील लिंगगुणोत्तरमध्ये अक्कलकोट तालुका प्रथम क्रमांकावर आला आहे. यामुळे बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे अभिनंदन देखील करण्यात आले आहे.
या प्रोत्साहनामुळे प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या टीमने चांगल्या प्रकारे कार्य करून हा गुणोत्तर दर हजारी मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण १ हजार ४५ पर्यंत वाढविला ही बाब नक्कीच तालुक्यासाठी समाधानकारक आहे. यामुळे मुलींविषयी पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.
केंद्र शासनाने बेटी बचाव, बेटी पढाओ या अभियानांतर्गत लिंग निवडी प्रतिबंध करणे, मुलीचे शिक्षण व आरोग्य याबाबत मार्गदर्शन करणे, मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, यामध्ये लिंग वाढीस व स्त्री-भ्रूणहत्या प्रतिबंध करण्यासाठी अंगणवाडी सेविका, सुपरवायझर, विस्तार अधिकारी यांनी कोरोनाच्या महामारी खूप मोठे काम केले आहे.गरोदर मातेच्या घरोघरी सर्वेनुसार भेटी दिल्यामुळे आणि त्यांच्या कुटुंबियांना मुली विषयी जनजागृती केल्यामुळे हा परिणाम दिसून येत आहे. सर्वांनी गरोदर मातेवर लक्ष केंद्रित करून काम केल्यामुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वाढलेले आहे,असे बाल विकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी सांगितले.
★ प्रभावी अंमलबजावणीमुळे सकारात्मक बदल
शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत परंतु त्याचा प्रभावी अंमल जर केला तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. तसाच प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे या प्रकल्पांतर्गत केला आहे आणि त्याचे
चांगले परिणाम अक्कलकोट तालुक्यामध्ये दिसून आले आहे – बालाजी अल्लडवाड, बालविकास प्रकल्प अधिकारी अक्कलकोट