Good news ! अक्कलकोट समर्थनगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर ; कुरनूर धरणातून मिळणार पाणी
अक्कलकोट, दि.१ : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या समर्थनगर अक्कलकोट ग्रामीणच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होऊन शहराच्या हद्दवाढ भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल १२ कोटी ९७ लाख रुपयेचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे.
यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, सरपंच जयश्री पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठा पाठपुरावा केला होता. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचा प्रारंभ शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आणि डॉ.गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.डॉ.राजीमवाले यांनी काम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कुरनूर ते अक्कलकोट असे १४ किलोमीटरची ही पाईपलाईन असून या योजनेत तीन टाक्या, अंतर्गत पाईपलाईन, फिल्टर टॅंक अशी कामे होणार आहेत.या योजनेत प्रति माणसी ५५ लिटर पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या समर्थ नगर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भागाला अक्कलकोट नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. हद्दवाढ भागात सुविधा मिळत नसल्याने २०११ साली स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतरही गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणच्या नागरिकांचा पाण्यासाठी लढा सुरू आहे. याला अखेर यश येऊन पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. येत्या वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण होऊन नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे माजी सरपंच प्रदिप पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच लालसिंग राठोड,स्वाती खराडे, ग्रामसेवक मारुती सुरवसे, वर्षा गडकरी, रोहिदास राठोड, अरुण तुप्पद, विकास गायगवळी, उदय नरेगल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाण्याचा प्रश्न मिटणार
समर्थ नगर ग्रामपंचायतीला सध्या आठ दिवसात तर उन्हाळ्यात पंधरा दिवसाला एकदा पाणी येते.आता ही नवीन योजना साकारत असल्याने या भागातील वर्षानुवर्षेपासून असलेला पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. साधारण ६ हजार लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे मिटणार आहे.