ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नवीन वर्षात मुंबईकरांना शासनाची मोठी भेट, ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई दिनांक:१ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ होईल.

मा. मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा
  • मुंबई देशाचे आर्थिक केंद्र.
  • १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत.
  • शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल  किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे.
  • सुविधा द्यायच्याच आहे, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे.
  • मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे.
  • मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत.
  • आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल.
  • शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते.  जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत.
  • २०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे.
  • ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो
  • देशाचा आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत
  • या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा
  • सामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्‍याचा हा प्रयत्न.
  • मला जाणीव आहे की केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेला देणे हे आपले कर्तव्यच.
  • मुंबईकरांना वचन देतो,  तुमच्या सगळ्या  गोष्टीची पुर्तता करण्यास, दिलेली वचन पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे फक्त तुमचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • मुंबईकरांचा  ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
  • सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, १६  लाख कुटुंबांना लाभ, मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय, नवीन वर्षाचं मोठी भेट
  • मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ
  • रुग्णालयात असूनही जनतेचे काम, शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते
  • कोविड काळात विकास कामांना कात्री नाही, सर्वसामान्यांच्या हिताचा हा निर्णय

मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे मुद्दे

मी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो

बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आदी वरिष्ठाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!