राज्यपालांनाच आमदार नियुक्तीचे अधिकार ! नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय घेतील विरोधकांचे आरोप बिनबुडाचे – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
मुंबई, दि. १३ ऑगस्ट – राज्यपालांना त्यांचे अधिकार माहीत आहेत. न्यायालयाने राज्यपालांना वेळेची मर्यादा दिली नसून, राज्यपालांना आमदार नियुक्तीचे अधिकार आहेत त्यामुळे नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय घेतील त्यामुळे विरोधकांनी टीका न करता राज्यपालांवर दबाव आणू नये, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद आज न्यायलयाने निकाली लावला असून या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यपाल कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे त्यांना न्यायालय निर्देश देऊ शकत नाहीत.
असेही न्यायालयाने नमूद केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, कोर्टानेही राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले असून हायकोर्टानेही राज्यपालांचा अधिकार अबाधित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यपालांवर कोणाचा दबाव आहे का या विषयाला आता मूठमाती मिळाली असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले. तसेच यासंदर्भात मंत्री नवाब मलिक यांनी केलेली टिका व विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून आपण राज्यपालांवर दबाव आणू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.