ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला ; आजी – माजी आमदारांचे वीस गावांवर लक्ष

मारुती बावडे

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस शिल्लक असल्याने गाव पातळीवरील प्रत्येक नेता हा मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तालुका पातळीवर राजकारण करणारे नेते मंडळी मात्र या गावांवर वर्चस्व ठेवण्यासाठी गनिमी कावा पद्धतीने डावपेच आखत आहेत. या निवडणुकीमध्ये आता वर्चस्व कोणाचे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या दोन-तीन महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने या वीस गावांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील दोन गटांनी यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या या वीस गावांमध्ये पदयात्रा, सभा, बैठका सुरू असून गावातील वाड्यावर कॉर्नर बैठका होत आहेत. तालुक्यातील शिरवळवाडी, कोन्हाळी, बोरगाव दे, बोरेगाव, हालचिंचोळी, अंकलगे, दहिटणेवाडी, रुददेवाडी, आंदेवाडी ज, पालापूर, घोळसगाव, नाविदगी, खानापूर, दर्शनाळ, अरळी, सदलापूर, हत्तीकणबस, शिरवळ, सलगर आणि सुलतानपूर या गावांमध्ये या निवडणुका सुरू आहेत. तालुक्याच्या राजकारणात सलगर कोन्हाळी, रुददेवाडी, बोरगाव दे, शिरवळ ही पाच गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून या गावांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप प्रयत्न करत आहे. या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून होणार आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुका अतिशय चुरशीच्या होतात कारण जितक्या खाली स्थानिक पातळीवर निवडणुका लागतात. तितक्या त्या चुरशीने होत असतात. अगदी प्रभागातील कामांसाठी कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचे याचा विचार मतदार करत असतो आणि गाव कोणाच्या ताब्यात द्यायचा याचा निर्णय या निवडणुकीत घेत असतो. जो सत्ताधारी आहे तो मागच्या पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत असतो तर नव्याने निवडणूक लढवणारे उमेदवार हे पुढील विकासाची संकल्पना मतदारांसमोर मांडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो असे चित्र सध्या या गावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे प्रचार कार्यात चुरस निर्माण झाली असून एकमेकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रचाराला अवघे तीन ते चार दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांची मोठी धावपळ सुरू आहे. त्यात बहुतांश मतदार हे पुणे, मुंबई व महाराष्ट्राच्या अन्य भागांमध्ये कामाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यांच्या गाठीभेटी त्यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न पॅनल प्रमुखांकडून केला जात आहे.

सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात थंडी आहे मात्र राजकीय परिस्थिती पाहता गावातील वातावरण मात्र तापू लागले आहे. या निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षावर नसल्या तरी गटातटात होत असल्याने गटप्रमुखांना ताब्यात ठेवून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न भाजपा आणि काँग्रेसकडून केला जात आहे. आता यात कोणत्या राजकीय पक्षाला यश मिळणार हे पाहावे लागणार आहे.

 

आजी – माजी आमदारांचे गावांवर लक्ष

या वीस गावांच्या निवडणुकीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गणित अवलंबून आहे.त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे निवडणूक लागलेल्या गावांवर बारीक लक्ष आहे. सर्वाधिक गावे ताब्यात ठेवण्यासाठी आपापल्या पातळीवर ते प्रयत्नशील आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!