अक्कलकोट तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना निधी मंजूर करा ; बाळासाहेब मोरे यांचे महसूल मंत्र्याना निवेदन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपये मंजुर झाले आहेत परंतु या टप्प्यात अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत त्यांनाही सरसकट ओला दुष्काळ निधी द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. मुंबईत त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित
होते.
पंचनामे झाल्यानंतर तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मिळाला असून या व्यतिरिक्त अक्कलकोट तालुक्यात संपूर्ण खरीप पिके सोयाबीन, उडीद, तुर मूग अतिवृष्टीमध्ये वाया गेले आहेत. काही ठिकाणी तर ऐन काढणीला आलेले पीक सुद्धा पाण्याने वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जात आहे.
ओला दुष्काळ निधीच्या टप्प्यामध्ये आमदार कल्याणशेट्टी यांनी ४२ कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर होऊन मदत निधी मिळावी. यासाठी मोरे यांनी आमदार पडळकर यांच्यासह पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू.ज्या ठिकाणी पिकांचे जास्त नुकसान झाले. त्या ठिकाणी निधी देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे व एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, असे आश्वासन विखे पाटील यांनी दिले असल्याचे मोरे यांनी सांगितले.