अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार अंजली मरोड यांची बदली झाल्यानंतर आता नवे तहसीलदार कोण याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.अद्याप नव्या तहसीलदारांचे नाव जरी निश्चित झाले नसले तरी संभाव्य तहसीलदारांमध्ये काही नावे समोर येत आहेत. त्यामध्ये बाळासाहेब शिरसाट आणि राजशेखर लिंबारे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
तालुक्यात सर्वाधिक काळ तहसीलदार म्हणून अंजली मरोड यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या बदलीनंतर ‘कही खुशी कही गम’ अशा प्रकारचे वातावरण तालुक्यात दिसू लागले आहे. त्यांची पदोन्नती होणार होती पण त्या पुन्हा तहसीलदार म्हणूनच सोलापूरला बदलून जात आहेत. यापूर्वी अक्कलकोटमध्ये तहसीलदार म्हणून प्रशांत ढगे, दीपक वजाळे, प्रभारी नायब तहसीलदार म्हणून राजशेखर लिंबारे यांनी चांगले काम केले आहे.
अक्कलकोट तालुका त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. खरे तर अक्कलकोट तालुका हा सीमावर्ती भाग आहे. तालुक्यात गावे मोठ्या प्रमाणात जोडली आहेत. कार्यक्षेत्र मोठे आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या ॲक्टिव तहसीलदाराची नेमणूक जिल्हा प्रशासनाने करावे, अशी एक नागरिकांची अपेक्षा आहे. तहसीलदार अंजली मरोड यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर नवे तहसीलदार कोण याची उत्सुकता मात्र तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे.
अद्याप तरी वरिष्ठ स्तरावरून नव्या तहसीलदारांच्या बदलीबाबत कोणतेही आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे तालुक्यात इच्छुक तहसीलदारांनी संबंधितांकडे जोरदार फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात आहे. परंतु प्रत्यक्षात आता वर्णी कोणाची लागणार हे पाहावे लागेल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात कोरोना साथीमुळे प्रशासनाचे कामकाज गतिमान होऊ शकले नाही.
या पार्श्वभूमीवर प्रशासनासमोर अनेक आव्हान असून ते पेलण्याच्या दृष्टीने नव्या तहसीलदाराची नेमणूक व्हावी, अशीही अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.