ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसाचा मोठा दिलासा, कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट  : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण सोमवारी संध्याकाळी शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या तीन दरवाजाद्वारे पाणी सोडले जात आहे.  यावर्षी सोमवारी सायंकाळी ७ वाजता हे धरण शंभर टक्के भरले.

तत्पूर्वी काल रात्री अचानकपणे तुळजापूर, नळदुर्ग तसेच हरणा नदीच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सकाळीच मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली. सकाळी धरणामध्ये ५२ टक्के पाणी साठा होता पण संध्याकाळपर्यंत तब्बल ४८ टक्के पाणी जमा झाले आणि ७ वाजता ओव्हरफ्लो झाले.  त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने पाणी खाली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर बोरी नदीकाठच्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनही सतर्क झाले असून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.  धरणाच्या तीन दरवाजाद्वारे प्रत्येकी २१० क्यूसेक पाणी बोरी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. तुळजापूर आणि नळदुर्ग भागातून ज्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्याच प्रमाणात धरणातून विसर्ग चालू आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा दिली आहे.

सध्या धरणांमध्ये ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून धरण पूर्ण क्षमतेने
भरलेले आहे.धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे सांगवी जलाशय तुडुंब भरून वाहत आहे.बोरी नदीवरती आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांनाही याचा उपयोग होणार आहे. त्याशिवाय नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. कुरनूर धरणावरती अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी या तिन्ही शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. आता धरण शंभर टक्के भरल्याने या तिन्ही शहरातून देखील समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!