मुंबई, दि. 20 : लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.उषा पद्मनाभन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यावेळी म्हणाले की, कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पावले उचलण्यात येत आहेत. कोविड लसीकरणाला राज्यात गती देण्यात आली असून पुढील काळात हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोविड लसनिर्मितीद्वारे हाफकिन इन्स्टिट्यूट यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवू शकते. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन लस, औषध निर्मितीकरीता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे, असेही श्री. ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक असून त्यासाठी केंद्र शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा. उत्कृष्ट दर्जाच्या लस निर्मिती व पुरवठा करण्यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिनने औषध निर्माण करण्याबरोरबच कोविड लस निर्मितीसाठी आयसीएमआर व भारत बायोटेक लिमिटेडकडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळाल्यास लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल. किंवा फील- फिनिश (Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून 126 लाख कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हाफकिन महामंडळाच्या परळ आणि पिंपरी येथे उत्पादन सुविधा उपलब्ध असल्याने कोविड लसीबाबत अनुषंगिक कामे सुरु करण्यात यावीत. हाफकिन महामंडळाच्या पोलिओ लस उत्पादन सुविधेची असलेली वार्षिक उत्पादन क्षमतेबरोबरच कोविड लसींची निर्मिती आणि पुरवठाही वाढविण्यात यावा. परळ येथील हाफकिन संस्थेत कालमर्यादेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी उपलब्ध असणारी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ज्ञ मनुष्यबळाची तरतूद या सगळ्या बाबी तपासून घ्याव्यात. हाफकिनमार्फत एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे 12 कोटी 60 लाख लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील ‘कोवॅक्सिन’ लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येईल. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पामधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल. ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे.