सोलापूर : मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि जुनैदी नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १५ जानेवारी रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता शिवछत्रपती रंगभवन येथील जुनैदी नर्सिंग होम येथे आयोजिलेल्या या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात पत्रकार दिनाचे औचित्य साधून मागील वर्षभरात विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या पत्रकारांना सन्मानित केले जाणार आहे. या शिबिरात कन्सल्टंट फिजिशियन डॉ. अ. हाफिज जुनैदी, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. जुवेरिया तनझीर जुनैदी, शरीर रसायनशास्त्र तज्ज्ञ डॉ. अजीम जुनैदी, डॉ. समरीन जुनैदी, आहार तज्ज्ञ तबस्सूम शेख अन्य तज्ज्ञ डॉक्टर मंडळी मधुमेह, रक्तदाब, हृदयाची इसीजी, गुडघेदुखी, मधुमेहींसाठी नेत्र तपासणी, व इतर तपासण्या करणार आहेत. आहार पध्दतीसंबंधी समुपदेशनही केले जाणार आहे. या शिबिराचा सर्व पत्रकार व कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अ. हाफिज जुनैदी व सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले आहे