ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २८: मुंबईला जागतिक दर्जाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी भक्कमपणे पावले उचलली असून रस्ते, चौक, पदपथ, वाहतूक बेटं, फ्लायओव्हर यांचे सुशोभीकरण केले जात आहे. मुंबईप्रमाणेच महानगर क्षेत्रात (एमएमआर) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पुढच्या टप्प्यात सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई सुशोभीकरण, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आदीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुंबई फर्स्ट संस्थेचे नरींदर नायर, संजय उबाळे, अशांक देसाई, नेवील मेहता, अश्वीनी ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई हे जगातले सर्वांत सुंदर शहर करण्याचा आमचा मानस असून त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यामुळे खड्डेविरहीत रस्ते ही संकल्पना साकारली जाणार आहे. मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी चौक, रस्ते, पदपथ, फ्लायओव्हर यांच्या सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे.

कोळीवाड्यांचे सुशोभीकरण केले जात असून त्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पर्यटनाच्यादृष्टीने कोळीवाड्यांचा विकास केला जात असून तेथील खाद्यसंकृतीची ओळख पर्यटकांना होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार असून सामान्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आपला दवाखाना उपक्रमाचे मुंबई फर्स्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. मुंबईमध्ये ग्लोबल वॉर्मिंग, बदलती शहरे वातवरणीय बदल यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!