ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई जीपीओ वास्तूचा इतिहास प्रथमच ई-पुस्तक रूपाने प्रकाशित

बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) राजभवन येथे झाले.

‘डॉन अंडर द डोम’ (Dawn Under The Dome) या डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक वास्तूचा इतिहास पुढे आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखिका व मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पाण्डे यांचे अभिनंदन करताना आज १०८ वर्षांनंतर देखील पोस्टाचे मुख्यालय असलेली ही वास्तू जनतेच्या सेवेत तत्पर असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

पोस्ट ऑफिसचे मुख्यालय केवळ वारसा वास्तू नसून जनसामान्यांच्या जीवनाशी निगडीत ती राष्ट्रीय संपदा असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

देशातील प्रत्येक व्यक्तीकडे पोस्टाच्या रम्य आठवणी आहेत असे सांगून पोस्ट विभागाने अश्या आठवणी देखील पुस्तक रूपाने संकलित केल्यास त्यातून एक सुंदर महाकाव्य तयार होईल अशी टिप्पणी राज्यपालांनी यावेळी केली.

आपल्या गावात पोस्टाची शाखा उघडली त्यावेळी गावभर मिठाई वाटली गेली. आप्तेष्टांच्या पत्रासाठी लोक अनेक दिवस वाट पाहत व तार आली तर प्रथम सर्वांना धस्स होत असे व तार करण्यासाठी शेकडो किलोमिटर दूर जावे लागे, अशी वैयक्तिक आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

सन १९१३ साली बांधून पूर्ण झालेल्या इंडो-सारसेनिक स्थापत्य शैलीतील जीपीओ इमारत वास्तूरचनाकार जॉन बेग व जॉर्ज विटेट यांनी डिझाइन केली होती. सन १९०४ साली इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली व १३ मार्च १९१३ रोजी जीपीओ इमारत बांधून पूर्ण झाली. इमारतीच्या बांधकामाला १८ लाख ९ हजार रुपये खर्च आल्याची माहिती स्वाती पाण्डे यांनी यावेळी दिली.

यावेळी राज्याचे प्रधान पोस्ट मास्टर जनरल हरीश चंद्र अगरवाल व पुस्तकाच्या सहलेखिका ऑर्कीडा मुखर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!