शिर्डी : साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या अपघातात १० जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांमध्ये ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर व बदलापूर येथील नागरिकांचा समावेश आहे.
वावी पाथरे गावाजवळ आज पहाटे हा अपघात झाला. साई दर्शनासाठी भाविकांना घेऊन ही बस (क्र MH 04 SK 2751) शिर्डीच्या दिशेनं निघाली होती. शिर्डीहून सिन्नरच्या दिशेनं येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (MH 48 T 1295) या बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात दहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिला, दोन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी दिली आहे.
नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.