ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मालक असावा तर असाच..! एका सराफ व्यवसाईकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले अनोखे दिवाळी भेट

चेन्नई : चेन्नईतील एका सराफ व्यवसाईकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिली आहे. चलनी ज्वेलर्सने रविवारी आपल्या दहा कर्मचाऱ्यांना कार तर वीस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बाईक भेट दिली.

या कर्मचाऱ्यांनी चढ-उताराच्या काळातही आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट आहे, असे चलनी ज्वेलर्सचे मालक जयंती लाल यांनी सांगितले आहे. या भेटीनंतर काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला.

दिवाळी जवळ येताच खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना बोनसचे वेध लागलेले असतात. सध्या कर्मचाऱ्यांना मिठाईव्यतिरिक्त काही भेटवस्तूही देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अशा काही भेटवस्तू देतात की त्या कायमच स्मरणात राहतात. त्या भेटवस्तूंमुळे त्या कंपनी आणि कंपनीचे मालकांची जोरदार चर्चा होते. अनेकांनाही असाच आपला बॉस असावा अशीही इच्छा निर्माण होते.

दरम्यान, एवढी मोठी भेट देण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी सुरतचे अब्जाधीश हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, कार आणि इतर मौल्यवान भेटवस्तू दिल्याने बरीच चर्चा झाली होती. २०१६ मध्ये त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच दिवाळी बोनस म्हणून ४०० फ्लॅट आणि १ हजार २६० कार दिल्या होत्या. त्यावेळी या बातमीने देशभरातील सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर, अनेक वर्षे बातम्या येत राहिल्या की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. आता चेन्नईच्या व्यावसायिकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्याने सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!