मुंबई : विधानसभेचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवसही चांगलाच चर्चेचा दिवस ठरला आहे. विरोधी पक्ष नेत्यानी राज्य सरकार विरोधात प्रतिविधानसभा विधीमंडळ परिसरातच भरवली होती. या प्रतिविधानसभेचा प्रक्षेपण काही वृत्तवाहिन्यांनी थेट दाखवित होते. याचे तक्रार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांचा प्रक्षेपण रोखण्याची विनंती अधिवेशनातील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना केली.
दरम्यान, तालिका अध्यक्ष म्हणून तात्काळ भास्कर जाधव हे खुर्चीवर बसले आणि त्यांनी या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्याचे व माध्यमांचं प्रक्षेपण रोखण्याचे आदेश दिले. पोलिसांनी प्रति विधानसभा सुरू असताना तेथील माईक काढून घेतला व माध्यमांनाही प्रक्षेपण करण्यास थांबवलं.
याप्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. लोकशाहीचा एक स्तंभ आम्ही आहोत तर दुसरा स्तंभ तुम्ही आहात. लोकशाहीच्या दोन्ही स्तंभांना कुलूप घालण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे म्हणून सरकारने आता दडपशाही सुरु केल्याचंही ते म्हणाले आहे.
खोटे आरोप लावून आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलणं सुरु आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, शांतपणे आमचं प्रतिअधिवेशन सुरु असताना मार्शल्स पाठवून, पत्रकारांवर दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न झाला आहे. आमचं अधिवेशन तर असंच सुरु राहणार. पण ते पत्रकारांवर दंडुकेशाही करत असतील तर मात्र आम्ही प्रेस रुममध्ये आमचं आंदोलन करु असे देवेंद्र फडणविस म्हणाले.