सोलापूर, (प्रतिनिधी): कोरोनाच्या महामारीत सरकारकडून देण्यात आलेले सर्व आदेश, सूचना आणि नियमांच्या आधीन राहून संपूर्ण महाराष्ट्रात नाट्यगृहाच्या 50 टक्के आसन क्षमतेने नाटकाचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. रात्रीची जमावबंदी असली तरी रसिक श्रोत्यांनी नाटक संपल्यानंतर गर्दी न करता घरी जाताना सोबत तिकिट बाळगल्यास कसलाच त्रास होणार नाही असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य तथा प्रसिध्द अभिनेता भरत जाधव यांनी केले. सोलापूरला ते नाट्यप्रयोगासाठी आल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी नाट्यक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीबाबत सविस्तरपणे माहिती दिली.
महाराष्ट्र ही कलावंत, साहित्यकांची, दर्दी रसिकांची भूमी आहे. परंतु गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कोरोनामुळे अनेकांना नैराश्य आले आहे. अनेकांना मानसिक दडपण आले आहे. हे सर्व दूर करण्यासाठी माणसाला काहीतरी आवश्यक आहे त्यात नाटक हे चांगले माध्यम आहे. नाटकामुळे माणसातील जिवंतपणा दिसून येतो.
कलावंत आपली कला नाटकातून सादर करताना त्याला समोर बसलेल्या रसिकांची दाद लगेच मिळते म्हणून तो कलावंत आणखी कष्टाने आपले अभिनय सादर करतो. त्यातून त्याला मानसिक समाधान मिळते तसेच समोर बसलेल्या रसिकांनाही नाटकातला आणि नाट्यकला सादर करणाऱ्या कलाकाराचा जिवंत कलाविष्कार पाहून मनावरील आलेले मळभ दूर झाल्याचे समाधान मिळते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांत प्रथम नाट्यक्षेत्राला मोठा फटका बसला सर्वात आधी बंद झालेले आणि सर्वांत उशिराने सुरू झालेले क्षेत्र म्हणजे नाटक सिनेमा आहे. मोठ्याप्रमाणात नाट्यकलाकार आणि त्यावर अवलंबून असलेल्यांना त्याची झळ बसली आहे. त्यातून सावरण्याची संधी मिळाली त्यातून शासनाने नाट्यगृहाच्या 50 टक्के आसन क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार हळू हळू नाट्यक्षेत्र पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाचा नवा अवतार येत असल्याने रात्रीची जमावबंदी करण्यात आली.
शासनाच्या नियमानुसार नाट्यगृह सुरू झाले नाटकही सुरू झाले. त्यातच जमावबंदीचा बाऊ होत आहे त्यातून रसिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. परंतु रसिकांनी कोणताही मनात संभ्रम न ठेवता नाटक पाहावे. संपूर्ण कुटुंबासह नाटकाला यावे. रात्री नाटक संपल्यानंतर घरी जाताना गर्दी न करता सोबत नाटकाचे तिकिट बाळगल्यास त्यांना कसलाही त्रास होणार नाही.
रसिकांच्या मनातील मळभ दूर व्हावे या उद्देशाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नाटकांचे प्रयोग सुरू होत आहेत. प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनीही संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात नाट्य प्रयोग सादर केले तसेच मीही सुरू केले आहे. सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि मुंबई असा पुन्हा सही रे सही हे नाटक घेवून आम्ही फिरत आहोत. कोकणामध्ये मोरूची मावशी हा प्रयोग सादर होणार आहे. हे नाट्य प्रयोग सादर करण्यामागे एकच हेतु आहे की प्रत्येक माणसाच्या मनावरील कोरोनाचे दडपण निघून गेले पाहिजे. मानसिक ताण कमी झाला पाहिजे आणि स्वच्छंदी जगता आले पाहिजे.
नाटकातून किती पैसे मिळतात किती फायदा होतो हे सध्या तरी गौण आहे. केवळ लोकांचे मनोरंजन करणे हाच हेतु यामागे आम्ही ठेवला आहे. नाटक संपल्यानंतर प्रत्येक रसिकश्रोत्यांना आवाहन करून जनजागृतीही आमच्याकडून केली जाते. असेही अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले. नैराश्यातून बाहेर यायचे असेल तर नाटक पाहिले पाहिजे असेही त्यांनी शेवटी सांगितले.