ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात फक्त सहा मुख्य रस्ते सुरू, तालुक्याला जोडणारे २१ रस्ते होतायेत बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केली उपायोजना.

अक्कलकोट, दि.२४ : कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही रस्ते बंद
करण्यात आले आहेत.

या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सहा रस्ते मात्र पर्यायी वाहतूक म्हणून सुरू ठेवण्यात आली आहेत.याठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत.यामध्ये अक्कलकोट उत्तरच्या हद्दीतील अक्कलकोट ते सोलापूर, अक्कलकोट ते वागदरी आणि अक्कलकोट ते हन्नूर या तीन रस्त्यांचा समावेश आहे तर अक्कलकोट दक्षिण हद्दीमधील दुधनी ते अफजलपुर,तडवळ ते सोलापूर, क्रांती चौक ते मेन रोड (सोलापूर ते अक्कलकोट) या रस्त्याचा समावेश आहे.

हे रस्ते अत्यावश्यक वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आले आहेत. तर बंद करण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोळसगाव ते उस्मानाबाद, सुलतानपूर ते उस्मानाबाद, इटकळ रोड ते उस्मानाबाद ,१४ मैल वागदरी गोगाव ते कर्नाटक, सलगर ते कर्नाटक त्याशिवाय अक्कलकोट दक्षिण मधील हिंगणी ते आळगी, गुडडेवाडी ते बरगुडी,पडणुर ते खानापूर, तोळणुर ते माशाळ,हैद्रा ते मणुर, हिळळी ते व्हसुर, दुधनी ते निंबाळ, बोरोटी ते माशाळ ,परमानंद तांडा ते माशाळ,मुगळी ते निंबाळ, बबलाद ते जेउरगी,मैंदर्गी ते मादन हिप्परगा, म्हेत्रे नगर ते अर्जुनगी, भोसगा ते निंगदळी, भोसगा ते मादनहिप्परगा तसेच वळसंगमधील विडी घरकुल ते विजय नगर मार्गे सोलापूर रस्ता बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यातील काही रस्ते बंद पण झाले आहेत.

हे रस्ते २४ एप्रिल पासून ते १ मेच्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद राहतील आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई -पास आवश्यक आहे,असे सांगण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन प्रसंगी अत्याआवश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवा सुविधेत येणाऱ्या सर्व प्रकारच्या आस्थापनांच्या वाहनांकरिता पर्यायी रस्त्याचा वापर केला जाईल,असेही पोलिस अधीक्षकांनी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!