ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले

★ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ राहिलेले शेकापचे सदस्य गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या श्री. देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

★ राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : – राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

★ ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 30 :- “ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!