मुंबई : १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेदार्थ नागपूर आणि पुण्यात भाजपच्यावतीनं आंदोलन करण्यात येत आहे. तर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार घोषणाबाजी करत आहेत. या 12 आमदारांचे निलंबन लोकशाहीच्या विरोधात आहे, तसेच ते नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांचं निलंबन परत घेण्याची मागणी केली आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याने भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाने आज विधानसभा सभागृहात न जाता पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा भरविली आहे.
भाजपच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घातला असुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून प्रतिअधिवेशन सुरु केली आहे. भाजपच्या प्रतिअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्ष महोदय खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केले जात आहे. खूर्चीवर बसून जे घडलेच नाही ते आरोप केले जात आहे. यामुळे मी आज या प्रतिसभागृहात मी प्रस्ताव मांडत आहे. यावर चर्चा सुरु करावी, जुलमी आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे. ज्या सदस्यांनी तुम्हाला नावे दिली आहेत, त्या सदस्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रति विधानसभेचे अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्याकडे केली.