ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अल्पशा पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

उजनीच्या पाण्याची  प्रतीक्षा मात्र कायम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

मागील दोन-तीन दिवसात हरणा आणि बोरी नदीच्या क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी साठ्यात किंचित वाढ झाली आहे.धरणाचा पाणीसाठा फार मोठा वाढलेला नसला तरी वाढलेल्या टक्क्यावर शेतकरी समाधान  व्यक्त करत आहेत.दुसरीकडे अद्यापही कुरनुर धरणाला उजनीच्या पाण्याची प्रतीक्षा मात्र लागून राहिली आहे. वाढलेल्या पाणी साठ्यामुळे धरणात आता ३६ टक्के  पाणीसाठा झाला आहे.चार दिवसापूर्वी  धरणात २७ टक्के पाणीसाठा होता. पावसाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण  होत आहेत.धरण भरेल या आशेने  शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी मात्र बोरेगाव, मुस्ती,इटकळ,संगदरी,तांदूळवाडी,काटगाव  या भागात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने हरणा आणि बोरी नदीच्या पात्रातून थोड्याफार प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात किंचित अशी  वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान उजनीचे पाणी कुरनूर धरणात सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु अद्याप हे पाणी या धरणामध्ये पोहोचलेले नाही. सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील तलाव भरून घेण्याचे काम पाटबंधारे विभाग करत आहे.ते भरल्यानंतर दर्शनाळ जवळून हरणा नदीद्वारे हे पाणी कुरनूरला येऊन मिळणार आहे.आता हे पाणी धरणात कधी पडेल याचीच प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!