सिडनी: सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या ऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ९६ या धावसंख्येवर खेळत आहे. चेतेश्वर पुजारा ९ धावांवर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे ५ धावांवर खेळत आहे. भारत सध्या २४२ धावांनी पिछाडीवर आहे.
याआधी सलामीवीर रोहित शर्मा २६ आणि शुभमन गिल ५० धावा करुन बाद झाले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 131 धावा केल्या. तर मार्नस लाबुशेनने 93 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 1 विकेट घेतला.
दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध थेट तिसऱ्या कसोटीसाठी मैदानात आलेला रोहित शर्मा ७७ चेंडूत २६ धावा करुन झेलबाद झाला. शुभमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने १०१ चेंडूत ५० धावा केल्या. अर्धशतक झळकावणाऱ्या शुभमनचा पॅट कमिन्सच्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीनने झेल घेतला. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अतिशय सावधपणे खेळत दिवस संपेपर्यंत आणखी पडझड होणार नाही याची काळजी घेतली.