अक्कलकोट, दि.३१ : कर्तव्य बजावत असताना कोरोना होऊन मृत्यू झाल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील अंगणवाडी सेविकेच्या वारसांना राज्य सरकारने ५० लाखाचा विमा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी दिली आहे.
सध्या राज्यात सर्वत्र कोरोनाची लाट आहे. अशा स्थितीमध्ये आशा वर्कर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक हे फ्रेंडलाईन वर्कर आहेत. गाव पातळीवर हे सर्व कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. अशामध्ये यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो हे गृहीत धरून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरुवातीलाच कोरोना होऊन मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले होते. या योजनेअंतर्गत राज्यातील सहा अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी ५० लाख रुपये देण्याचा निर्णय राज्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो यांनी घेतला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील अंगणवाडी सेविकेला याचा लाभ मिळणार आहे.
हलीमाबी सगरी या सेविकेचा २० जुलै २०२० रोजी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. तसा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ स्तरावर दिला होता त्यानंतर तो मंजूर करण्यात आला आहे.लवकरच त्यांच्या वारसांना धनादेश देण्यात येईल, असे बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी सांगितले.