आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांचे सोलापुरात सात दिवस “चित्र स्पर्श कला प्रदर्शन” : 25 चित्रांचा समावेश
सोलापूर – सोलापूरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांची नावाजलेली चित्रे लवकरच परदेशात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम “मायभूमी” सोलापूरकरांच्या भेटीला ही चित्रे प्रदर्शनाच्या माध्यमातून ठेवण्याचा संकल्प केला असून यानिमित्ताने १४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत निर्मलकुमार फडकुले सभागृहात “चित्र स्पर्श कला प्रदर्शन २०२२ “चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चित्रकार सचिन खरात यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
चित्र स्पर्श कला प्रदर्शनाचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अरण्यऋषि मारुती चितमपल्ली, पोलीस आयुक्त हरीश बैजल, तृतीयपंथी हक्क संरक्षण कल्याणकारी मंडळाच्या राज्य कार्यकारणी सदस्य दिशा पिंकी शेख, उद्योजक यतीन शहा – डॉ. सुहासिनी शहा, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, लोकशाहीर संभाजी भगत, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे ,ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि संजीव पिंपरकर यांच्या हस्ते होणार आहे .प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, मनपा उपायुक्त धनराज पांडे, आयएमएसच्या सायली जोशी, उद्योजक किशोर चंडक, डॉक्टर संदेश कादे, सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी, शिल्पकार भगवान रामपुरे ,हास्यसम्राट दीपक देशपांडे, चित्रकार शशिकांत धोत्रे आणि मुंबईचे आर्ट डायरेक्टर सतीश पोतदार उपस्थित राहणार आहेत .तसेच या कार्यक्रमास पुरुषोत्तम बरडे, अमोल शिंदे, विनोद भोसले, आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, संतोष पवार, मिलिंद थोबडे, उमेश गायकवाड, बाळासाहेब वाघमारे ,विजय बाहेती, चेतन बुऱ्हाणपूर, मनोज खुबा, मयूर बाकळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या पत्रकार परिषदेला समीर लोंढे, ऐश्वर्या सोनकांबळे, अजिंक्य वाघमारे, चेतन बुऱ्हाणपूरे आणि सतीश पोतदार उपस्थित होते.
- गरजू मुलांना देणार गुरुकुलात मोफत चित्रकलेचे प्रशिक्षण
मुंबईच्या जे जे महाविद्यालयातून पदवी घेतली. चित्रकलेच्या प्रांतात स्वतःचे नाव प्रस्थापित केले. जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला. चित्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्य उभं करणं ही फार खर्चिक आणि जोखमीची गोष्ट आहे. सारी आव्हाने पार करून स्वतःचा ब्रॅण्ड निर्माण केला आहे . काहीतरी वेगळे आणि भन्नाट करावे हा ध्यास मनाशी बाळगून त्यातूनच एक गुरुकुल बनविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी जमीन खरेदीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून होतकरू कलाकारांना कलेचे ज्ञान द्यायचे हा उद्देश आहे .नृत्य, गायन, चित्रकला, संगीत, अशा कलांचे प्रशिक्षण या माध्यमातून दिले जाणार आहे. प्राचीन काळातील गुरुकुलाप्रमाणेच या गुरुकुलाची रचना असणार आहे .मोठ्या वृक्षांच्या छायेखाली विद्यार्जन हे गुरुकुलाचे वैशिष्ट्य असणार आहे .या गुरुकुलातील शिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची निवड स्वतः करणार आहे. भव्य सभागृह ,मेडिटेशन हॉल, कलादालन, वाचनालय, संग्रहालय अशी त्या गुरुकुलाची रचना असणार आहे. संग्रहालयात जुन्या व प्राचीन वस्तू पाहायला मिळणार आहेत. सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थी गुरुकुलाचा लाभ घेऊ शकणार आहेत .