विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं जयंत पाटलांना भोवलं, हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित
नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस चांगलाच गाजला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. त्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.
दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणाबाबत विधानसभेत चर्चा झाल्यानंतर या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यानंतर सभागृहात राष्ट्रवादीसह शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. परंतु विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलूच देत नसल्याचा आरोप करत जयंत पाटलांनी थेट विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यानंतर आता त्यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. त्याला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे.
दिशा सालियन प्रकरणावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. परंतु अध्यक्षांनी पवारांची मागणी फेटाळून लावल्यानं विरोधी पक्षातील आमदार सभागृहात आक्रमक झाले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उद्देशून ‘तुम्ही निर्लज्जपणा करू नका’, असं म्हटलं. त्यामुळं जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळं सत्ताधारी पक्षातल्या आमदार आक्रमक होत जयंत पाटलांचं एक वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी केली. परंतु सभागृहात गदारोळ झाल्यानंतर अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आमदारांनी बैठक घेतली.
दिशा सालियन प्रकरणाची चौकशी एसटीआयकडे- फडणवीस
सीबीआयकडे दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कधीच देण्यात आलेली नव्हती, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत केली जात आहे. दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीबाबत सीबीआयला विचारणा केली आहे. परंतु हे प्रकरण त्यांच्याकडे नाही. त्यामुळं या प्रकरणात कुणाबद्दलही राजकीय आकस न ठेवता एसआयटीमार्फत निष्पक्षपणे चौकशी केली जाणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली आहे.