ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात १४ हजार ६५० हेक्टरवर खरीपाची पेरणी

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यात आता पर्यंत १४ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. अधून मधून पावसाची हुलकावणी मिळत असल्याने पेरणीला विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रा पैकी ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर तूर , ४०० हेक्टर क्षेत्रावर उडीद, १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मूग तर १ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याचे तालुका कृषी विभागाने सांगितले आहे.

नेहमीच दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या तालुक्यात गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस होऊन नदी, नाले, ओढे, तलाव तुडूंब भरून वाहताना पाहून तालुक्यातील बळीराजा सुखावला होता. परंतु यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यात काही भागात तुरळक पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर तालुक्यातील काही भाग अजून ही कोरडा ठणठणीत असल्याने या भागातील पेरण्या खोळंबल्याआहेत. सध्या तर गेल्या चार – पाच दिवसापासून तालुक्यात फक्त ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा जोर वाढल्याने पेरणी झालेले शेतकरी व पेरणी न केलेले दोन्ही ही शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत. कारण खरीपाची पेरणी झालेल्या भागात पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची तर पेरणी न झालेल्या भागात कधी एकदा पाऊस पडेल आणि कधी एखदा खरिपाची पेरणी होईल याच चिंतेने सध्या तालुक्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

जून महिना संपत आला तरी अजूनही तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.नेहमीच दुष्काळाने होरपळून निघालेल्या अक्कलकोट तालुक्याला जून महिना संपत आला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या आठवडाभरात तालुक्यात नुसतेच पावसाचे जमून आलेले ढग पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तुटपुंज्या पावसावर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तालुक्यात काही ठराविक भागातच पेरण्या झाल्या आहेत. तर तालुक्यातील काही भागात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाचा हा खेळ संपून अक्कलकोट तालुक्यात कधी एकदा दमदार पाऊस होईल याची चिंता तालुक्यातील शेतकऱ्यांना लागली आहे.

गेल्यावर्षी समाधानकारक पाउस झाल्याने आणि खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना ही उपलब्ध पाण्यावर रब्बी हंगाम मात्र शेतकऱ्यांना फायद्याचा ठरला होता. यंदाच्या हवामान अंदाजानुसार शेतकरी सुखावला होता. जून महिना सुरू होताच वरुणराजा दमदार बरसेल असा तालुक्यातील शेतकऱ्यांची आशा होती. मात्र जून महिना संपत आला तरी तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावत सलामी दिली. जून महिन्यात तालुक्यात फक्त ६२ मिमी इतकाच पाऊस झाला आहे. तालुक्याच्या कृषि विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते की, कमी पावसावर पेरणी करू नये.

परंतु काही शेतकरी तरीही पावसाचे प्रमाण कमी असताना ही मैंदर्गी, दुधनी, वागदरी, चपळगाव, किणी या पाच सर्कल मध्ये सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत.तर तडवळ,करजगी व जेऊर भागात मात्र पावसाचे प्रमाण फारच कमी राहिल्याने या भागातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. तडवळ, करजगी, पानमंगरुळ व जेऊर भागात पाऊस दडी मारल्याने या भागात सर्वात कमी म्हणजे ५० टक्के पेक्षा ही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे या भागातील खरीप पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!