मुंबई : ’स्टार प्रवाहवरील ’मुलगी झाली हो’ या मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यावर मालिकेच्या निर्मात्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
पण, किरण माने यांच्यावरील कारवाई ही राजकीय नसल्याचा खुलासा मालिकेच्या निर्मात्यांनी ‘सामना ऑनलाईन’ला दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे. माने यांच्या कारवाईमागील कारण जाणून घेण्यासाठी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांच्याशी सामना ऑनला ईनने संपर्क साधला होता. त्यावर, किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी ही निव्वळ व्यावसायिक कारणाने झाली आहे. या कारवाईचा कोणताही राजकीय संबंध नाही, अशी प्रतिक्रिया सुझाना घई यांनी दिली आहे.
माने यांना यापूर्वीही त्यांच्या वर्तणुकी विषयी इशारा देण्यात आला होता. त्यामुळेच त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया जाहीर करण्यात येईल, असं घई यांनी ‘सामना ऑनलाईन’शी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, किरण मानें विरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला असून या कारवाईला ’सांस्कृतिक दहशतवाद’ म्हटले आहे.