अक्कलकोट, दि.१० : कुरनूर धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उद्या (बुधवार) दि.११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी दिली आहे.या पार्श्वभूमीवर बोरी नदीकाठच्या गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली आहे.यावर्षी कुरनूर धरण भरल्यापासून पहिल्यांदाच पाणी खाली सोडण्यात येत आहे. यावर्षी पावसाळा देखील चांगला झाल्याने धरणात अजूनही जवळपास ९० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.यातून नदीकडच्या गावांना पिण्याचे पाणी मिळणार आहे तसेच शेतीला देखील रब्बी हंगामातील पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
सांगवी ,अक्कलकोट ,निमगाव, मिरजगी, सातनदुधनी, संगोगी,रुद्धेवाडी,बबलाद हे आठ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पाण्याने भरून घेतले जाणार आहेत.साधारण दोन दिवस पाणी सोडण्याची प्रक्रिया चालणार
आहे.यात धरणातून २० टक्के पाणी वजा होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे.चारच दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.या बैठकीमध्ये १५ जानेवारी पूर्वी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता परंतु बैठकीच्या दोन दिवसानंतर पाटबंधारे विभागाने त्वरित ही कार्यवाही सुरू केली आहे.शेतकऱ्यांनी सतर्क राहावे,असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.