कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांवर रोष;कुरनूर धरणातून १५ जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन
अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट
तालुक्यात शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाटबंधारे विभागाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.अधिकारी भेटत
नाहीत, बेकायदा पाणी परवाने देतात तसेच बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा विषय मनावर घेत नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दखल घेत अधिकाऱ्यांना धारेवर
धरले.२०२२-२३ या वर्षीच्या रब्बी व उन्हाळी हंगामाकरिता अक्कलकोट येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.त्यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी कुरनूर धरण व धरणाखालील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा आढावा घेतला.यावेळी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले.कुरनूर धरणात सध्या ९२ टक्के पाणी आहे.पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.शेतकऱ्यांच्या पाणी सोडण्याच्या मागणीचा विचार करता येत्या १५ जानेवारीपर्यंत कुरनूर धरणातून पाणी खाली सोडण्याचे नियोजन केले जाईल,अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी बैठकीत सांगितले.मिरजगी बंधारा व गळोरगी तलावाच्या बाबतीत पाटबंधारे विभागाने
लाभ क्षेत्राच्या बाहेर जाऊन काही पाणी
परवाने दिले आहेत हे चुकीचे असून ते तात्काळ थांबवले पाहिजेत अन्यथा पाटबंधारे विभागाचे कामकाज आम्ही चालू देणार नाही, असा इशारा पक्षनेते महेश हिंडोळे यांनी दिला. बादोले येथेही असा प्रकार झाला असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी विरोधी
पक्ष नेते बाळासाहेब मोरे यांनी दिली.कुरनूर धरणाखाली असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची काही ठिकाणी गळती झाली आहे.काही ठिकाणी दुरुस्ती बाकी आहे ते तातडीने दुरुस्त केले जावेत,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावरचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना आमदार कल्याणशेट्टी यांनी केली.कुरनूर धरण ते बावकरवाडी फाटा हा रस्ता अतिशय खराब झाल्याचा प्रश्न तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे आणि संभाजी बेडगे यांनी उपस्थित केला.यावर बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी या रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केले आहेत त्याचे काम लवकरच सुरू होईल,असे सांगितले.बैठकीचे प्रास्ताविक शाखा अभियंता नितीन चव्हाण यांनी केले.त्यांनी सध्य स्थितीची शेतकऱ्यांना
माहिती दिली.यावेळी पाटबंधारे
विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे,भाजप शहराध्यक्ष शिवशरण जोजन,भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष नन्नु कोरबू,अमर पाटील,राहुल काळे आदींसह लाभ क्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.