अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून रब्बी पिकांसाठी येत्या
शुक्रवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.पाटबंधारे विभागाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी हा घेण्यात आला.या बैठकीत धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन व ते काटकसरीने वापरण्यावर
चर्चा झाली.यावर्षी अतिपावसामुळे कुरनूर धरण तुडुंब भरले होते.सध्या धरणामध्ये ७८ टक्के म्हणजेच ६४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.त्या माध्यमातून धरणाखाली असणारे आठ कोल्हापुरी बंधारे भरून घेण्यात येणार आहेत.याद्वारे धरणातून २० ते २१ टक्के पाणी कमी होणार आहे.दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.त्यानुसार ही
बैठक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात पार पडली.या निर्णयामुळे दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट या तिन्ही नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून नियोजन करण्यात आले.यावर्षी मार्च सुरू झाला
तरी ८० टक्क्यापर्यंत पाणी आहे.पाणी मुबलक असल्याने यंदाचा उन्हाळा तालुक्याच्या दृष्टीने चांगला राहील,
असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मिरजगी,सातनदुधनी,संगोगी,रुददेवाडी, बबलाद,सांगवी,बणजगोळ,सिंदखेड हे सर्व बंधारे भरून घेतले जाणार आहेत.त्याचा फायदा बोरी नदीकाठच्या गावांना व रब्बी पिकांना होणार आहे.या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,सभापती अॅड.आनंदराव सोनकांबळे,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मोहन जाधवर,शाखा अभियंता रोहित मनलोर,उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा,एन.व्ही.उदंडे यांच्यासह विविध गावचे सरपंच, संबंधित अधिकारी व सल्लागार समितीचे सदस्य,नदीकाठचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुसऱ्या आवर्तनाचा निर्णय
स्थिती पाहून घेणार
या बैठकीत पहिल्या आवर्तनासाठी एकमत झाले.यानंतर उन्हाळ्यातील टंचाई पाहून दुसऱ्या आवर्तनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.पहिल्या आवर्तनातील पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी आहे.त्याचा काटकसरीने वापर
करावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.