ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ.लालासाहेब तांबडे यांना अतिविशिष्ट शास्त्रज्ञ २०२३ पुरस्कार प्रदान; आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाला सन्मान

सोलापूर ,दि.१४ : येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब रावसाहेब तांबडे यांना “अतिविशिष्ट शास्त्रज्ञ 2023” हा मानाचा पुरस्कार शेर- ए- कश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ श्रीनगर, जम्मू कश्मीर येथे पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार तांत्रिक सतराच्या समारोप कार्यक्रमामध्ये जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ व एस. ए. आय. एल. विद्यापीठ कंनसास, यु. एस. ए. चे संचालक आणि भारताचे मिलेटचे ग्लोबल अँबेसिडर माननीय डॉ. पी. व्ही. वरा प्रसाद यांचे शुभ हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास इतर सन्माननीय मान्यवर म्हणून मा. डॉ. शब्बीर वाणी संचालक व अधिष्ठाता शेर-ए- कश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ श्रीनगर, माननीय डॉ.प्रकाश कुमार झा, शास्त्रज्ञ, एस. ए. आय. एल. युएसए, तसेच माननीय डॉ. कोटा चक्रपाणी संचालक, केंद्रीय कृषी विद्यापीठ इम्फाळ आदीं मान्यवर उपस्थित होते. डॉ. लालासाहेब तांबडे यांच्या नाविन्यपूर्ण कृषी विस्तार कार्यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सदरील पुरस्कारांसाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. तांबडे यांचे अनेक कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अनेक संचालक, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उप-महा निर्देशक मा. डॉ. यु. एस. गौतम, तसेच राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ झांसी चे कुलगुरू माननीय डॉ. एक.के.सिंग व शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रदीप गायकवाड यांचे सह समाजातील अनेक मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे.
श्रीनगर जम्मू कश्मीर येथे दिनांक 9 ते 11 जून 2023 रोजी हवामानातील बदल व त्यांचे परिणाम या विषयावर पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शेर- ए- कश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ श्रीनगर, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, कृषी व पर्यावरण विकास सोसायटी उत्तराखंड, कृषी विद्यापीठ रायचूर कर्नाटक, मिड -वेस्ट युनिव्हर्सिटी सुर्खेत नेपाळ व शेर-ए- बांगला कृषी विद्यापीठ ढाका बांगलादेश यांच्या संयुक्त विद्यामाने श्रीनगर येथे करण्यात आले होते. या परिषदेसाठी डॉक्टर लालासाहेब तांबडे यांना सन्माननीय वक्ता म्हणून निमंत्रितही करण्यात आले होते, त्यांनी “लीड स्पीकर” म्हणून सदरील परिषदेमध्ये “कृषी पर्यटन संकल्पनेचा महाराष्ट्रामध्ये झालेला प्रसार व शेतकरी उत्पादनामध्ये झालेली वाढ” याबाबत नाविन्यपूर्ण सादरीकरण केले. तसेच परिषदेच्या तिसऱ्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये डॉ. लालासाहेब तांबडे यांना सहभागी मान्यवरांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी तिसऱ्या तांत्रिक सतराचे सन्माननीय उपाध्यक्ष म्हणून सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली.
सदरील पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हवामानातील बदल व त्याचे शेतीवर होणारे परिणाम यावर देश विदेशातील कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, कृषी शास्त्रज्ञ, भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी व कृषी विज्ञान केंद्र/ कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ आदींची अनेक सादरीकरणाद्वारे साधक बाधक चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये भारतासह नेपाळ, बांगलादेश म्यानमार, अमेरिका इत्यादी अनेक देशाचे १२०० पेक्षा जास्त शास्त्रज्ञ व वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व अभाषी स्वरूपात सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!