सोलापूर, दि.22 :- महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे राबविली जात आहेत. पुढील काळात विकासकामातूनच सोलापूरची राज्यात वेगळी ओळख निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
बाळे येथे प्रभाग क्रमांक पाच अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, भरत जाधव, गणेश पुजारी, किशोर पाटील, संतोष पवार, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, सोलापूर शहरात विविध विकास कामे राबवून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. येथे विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श शहर अशी सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच शहराच्या विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक पाच मध्ये विविध विकास कामे झालेली आहेत व पुढील काळात ही अशीच कामे सुरू राहतील, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगून या भागाच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी करून प्रभाग क्रमांक पाचमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच पुढील काळात या भागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली.
प्रारंभी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्र नूतनीकरण इमारतीचे लोकार्पण फित कापून करण्यात आले. त्यानंतर श्री खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविणे, खंडोबा मार्ग रस्त्याचे काम करणे, नंदी कट्ट्याचे जीर्णोध्दार व पाटील गल्ली परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन श्री.भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.