ध्यास विश्वसार्ह बातमीचा

5 डिसेंबरला नवे मुख्यमंत्री घेणार शपथ

देवेंद्र फडणवीसांची वर्णी

मुंबई  वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला असूनही 8 दिवस झाले तरीही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठे बहुमत मिळाले आहे. त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेले असून भाजप नेते पक्षाच्या पदाधिकारी व आमदाराच्या बैठकी घेत आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा दि. 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे भाजपाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दि. 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपपदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

 

काही वेळापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले आहे. दि. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व आमदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच, महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले. यासह प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असेही ठरल्याचे कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!