सोलापूर, दि.29: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या सामान्य रूग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आहे. गावातल्या गावात कोरोना रूग्णांना उपचार मिळून रूग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार लोकसंख्येच्या गावात ‘गाव तिथं कोविड केअर सेंटर’ उभारण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये महिला कोरोना रूग्णांवर महिला डॉक्टर आणि कर्मचारी उपचार करणार आहेत.
महिला रुग्णांना पुरुष वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्याशी अडचणी व इतर होणारा त्रास सांगणे शक्य होत नाही. ग्रामीण भागातील महिलांना याबाबत अधिक अडचणीचा सामना करावा लागतो. महिला कोरोना रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील सध्या सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी महिला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेणार आहेत. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम करणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील महिला रुग्णांनी स्वागत केले असून महिला रुग्णांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
1 मेपासून सर्व गावात कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न -श्री. स्वामी
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.स्वामी यांनी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. शहरातील मोठ्या दवाखान्यात जावे लागू नये, म्हणून ग्रामीण भागातील जनता आजार लपवत आहे. त्यांना शहरात जावे लागू नये, गावातल्या गावात उपचार करता यावेत. लक्षणे नसलेल्या व सौम्य कोरोनाची लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी गावपातळीवरच उपचाराची सोय व्हावी व शहरातील कोविड हॉस्पिटलवरील भार हलका व्हावा या उद्देशाने उपक्रमाची जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यात नव्याने 100 कोविड केअर सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत 12 गावात कोविड केअर सेंटर सुरू झाली आहेत. राहिलेल्या गावात 1 मेपासून कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही श्री. स्वामी यांनी सांगितले.