बीड : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर काल निकाल आला असून सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा कायदा रद्द केला आहे. तसेच गायकवाड समितीच्या शिफारशीही नाकारल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून येत आहे. बीड येथे आज ६ मे रोजी समाजबांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा एकदा राज्यभर मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. अशी माहिती शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी दिली.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले की, आरक्षण रद्द जे झाल आहे, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार आणि अशोकराव चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे. या सरकारला ठिकाणावर आणण्याकरता २०१६ सारखे संपूर्ण राज्यभर जसे मोर्चे निघाले होते, तशा प्रकारचे आंदोलन करण्याचा निर्णय आज घेतलेल्या बैठकीत झाला आहे. आंदोलनाची सुरुवात उद्या ७ मे पासून करणार आहोत असे विनायक मेटे यांनी सांगितले.
आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाचा परिणाम संपूर्ण राज्यातील ३५ ते ४० टक्के समाजावर होत आहे. असा एवढा मोठा निर्णय असताना, घाला घातला असताना आम्ही शांत बसणे आम्हाला परवडणार नाही. पुढच्या पिढीसाठी काही निर्णय घेऊन विचार करणे आवश्यक आहे असे विनायक मेटे म्हणाले.