नवी दिल्ली : पत्रकारिता धर्माचे पालन करून महाराष्ट्राच्या मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना देण्यासह विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात मराठी पत्रकारितेने मोलाची भूमिका बजावली असल्याचे मत महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ४६वे पुष्प गुंफताना “महाराष्ट्राच्या विकासात मराठी पत्रकारितेचे योगदान” या विषयावर डॉ. गव्हाणे बोलत होते.
सत्य सांगणे हा पत्रकारितेचा धर्म असून त्याचे पालन मराठी पत्रकारितेने उत्तमरित्या केले आहे. मराठी पत्रकारिता नव्या युगाची पत्रकारिता असली तरी तिचे मूलभूत तत्व बदलले नाही. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्याच्या विकासाचे विविध प्रश्न मराठी पत्रकारितेने सक्षमपणे मांडले आहेत व शासनाने ही याची वेळोवेळी दखल घेत प्रश्न मार्गी लावले आहेत. राज्याची संस्कृती व तेजस्वी परंपरेचे संचित जतन करून जनतेपर्यंत नेण्याचे मोलाचे कार्यही मराठी पत्रकारितेने सक्षमपणे केल्याचे डॉ. गव्हाणे म्हणाले.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याच्या नव्या आकांक्षा, नवी दृष्टी जनतेपर्यंत घेवून जात जनमत घडविण्याचे काम मराठी पत्रकारितेने केल्याचे सांगून डॉ गव्हाणे यांनी मराठी पत्रकारितेच्या गेल्या सहा दशकाच्या कालखंडाची काही घटकांमध्ये वर्गवारी केली. त्यानुसार पहिला घटक स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा असून त्यास ‘प्रहार कालखंड’ संबोधले आहे . या कालखंडात ब्रिटीश सरकार व समाजातील कुरितींवर प्रहार करण्याचे काम राष्ट्रप्रेमी पत्रकार संपादकांनी केल्याचे यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आदींचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठी पत्राकारितलेला बहार आला म्हणून १९६० ते १९८० या कालखंडाचा उल्लेख डॉ. गव्हाणे यांनी बहार कालखंड असा केला. या कालखंडात वृत्तपत्रांची प्रगती झाल्याचे ते म्हणाले. नानासाहेब परुळेकरांनी सुरु केलेले ‘सकाळ’ वृत्तपत्र यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने उभे राहिलेले ‘विशाल सहयाद्री’ यासह ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘नवा काळ’, ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’ या वृत्तपत्रांना या काळात बहार आलेला दिसतो. मुंबई आणि मुंबई बाहेर वृत्तपत्रांचा विकास या काळात होताना दिसतो. नागपूर मध्ये दै.तरूण भारत, दै.लोकमत, दै.नागपूर पत्रिका, हितवाद ही दैनिक विदर्भात विकसीत झालेली दिसतात.
१९७० ते १९८० आणि १९८० ते १९९० या काळात महाराष्ट्राच्या जिल्हया जिल्हयामध्ये नव नवी वृत्तपत्रे उदयाला आल्याचे डॉ. गव्हाणे म्हणाले. जिल्हा दैनिकांनी त्या त्या भागाच्या आशा आकांक्षा विकासाचे प्रश्न जनतेसमोर अणि शासनासमोर मांडण्याचे उत्तम काम आपल्या निदर्शनास येते. सोलापूरचे दै. संचार, नाशिक येथून प्रकाशित होणारे दै गावकरी, कोल्हापूरचे दै. सत्यवादी , दै.पुढारी, दै. संदेश यासह धुळे येथून प्रकाशित होणाऱ्या दै. आपला महाराष्ट्र या वृत्तपत्राचा त्यांनी उल्लेख केला.
मराठी पत्रकारितेतील संपादकांच्या कार्यावर प्रकाश टाकताना डॉ गव्हाणे यांनी दै. लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजणी, माधवराव गाडगीळ, महाराष्ट्र टाईम्सचे संस्थापक संपादक द्वा.भ. कर्णिक, गोविंद तळवलकर यानंतरच्या कालखंडात आलेले कुमार केतकर, भारतकुमार राऊत. नवशक्तीचे संपादक प्रभाकर पाध्ये , दै. सकाळचे नानासहेब परुळेकर आदी संपादकांनी पत्रकारितेचा मानदंड निर्माण केला . या संपादकांनी मराठी पत्रकारितेला नवी दिशा दिली व विकासात्मक पत्रकारितेचे मौलिक कार्य केल्याचे डॉ. गव्हाणे म्हणाले.
लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स या दैनिकांच्या विभागवार आवृत्त्या निघाल्या. दैनिकांचा विस्तार झाला आणि या दैनिकांनी त्या त्या भागातील प्रश्न मांडले व शासनानेही याची दखल घेतली. विदर्भातील आंदोलनाबाबत त्या भागातील दैनिकांनी चांगली भूमिका बजावली. विदर्भासह, मराठवाडा, खान्देश, कोकण या मागास भागातील प्रश्न मांडण्याबाबत वृत्तपत्रांनी विकासाची भूमिका बजावली त्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न तडीला लागले. मागासलेले प्रदेश जसजसे विकसीत होत होते तसतसे या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील दैनिकांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले.
१९८० ते २००० हा मराठी पत्रकारितेतील विकासाचा कालखंड होता तर २००० ते २०२० हा तंत्रज्ञानाचा कालखंड होता असे सांगून डॉ. गव्हाणे यांनी या कालखंडांवर प्रकाश टाकला. मराठी भाषेचे संचित असणाऱ्या साहित्य संस्कृती, नाटय, कला या क्षेत्रात पत्रकारितेने मोलाची भूमिका वठवित मराठी परंपरेचे संचित रविवार पुरवण्यांच्या माध्यमातून वाचकांपर्यत पोहचविण्याचे व त्यास प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य केल्याचे डॉ. गव्हाणे म्हणाले.
नव्या पिढीतील पत्रकार, संपादकांनी लोकशाहीचे रक्षण करण्याची व महाराष्ट्राच्या प्रगतीच्या भूमिकेची पाठराखन करावी ,अशा भावनाही डॉ. गव्हाणे यांनी व्यक्त केल्या.