प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२१ : शिवजयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु येथील शिवछत्रपती तरुण मंडळ यांच्याकडून दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी व सोलापूर आकाशवाणी केंद्राचे वृत्त निवेदक मारुती बावडे यांना जाहीर झाला आहे. तर छत्रपती युवारत्न पुरस्कार कुरनूर गावचे सुपुत्र सोलापूर जिल्हा घडामोडीचे प्रमुख विवेक शेकापूरे यांना जाहीर झाला आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न बावडे यांनी केला आहे.पत्रकारितेत क्षेत्रात आपले काम आणि जबाबदारी निर्भीडपणे पार पाडून केवळ तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात वेगळा ठसा उमटविला आहे अशा व्यक्तींचा सन्मान करणे हे प्रतिष्ठानचे काम आहे,असे सरपंच मेजर बाळासाहेब भोसले आणि विष्णू भोसले यांनी सांगितले. तर सोशल मीडियाच्या युगात सोलापूर जिल्हा घडामोडीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आपले भरीव असे योगदान दिल्याबद्दल विवेक शेकापूरे यांना देखील छत्रपती युवा रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा घडामोडीच्या माध्यमातून ते विविध अपडेट निरपेक्ष भावनेने देत असतात. त्याबद्दल बावडे आणि शेकापुरे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. याबरोबरच डॉ.आर. व्ही. पाटील ( आदर्श सेवा), अनिल भोसले (आदर्श शेतकरी ),रघुनाथ कापसे, (आदर्श शेतकरी) मौला मुजावर (सद्भावना) ,अशोककुमार सुतार (आदर्श शिक्षक), महावीर येणेगुरे (आदर्श शिक्षक ) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.या पुरस्काराचे वितरण आमदार सचिन कल्याणशेट्टी, व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम बुधवारी सायंकाळी सहा वाजता सांगवी येथे होणार आहे.तरी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.