मुंबई : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर भाजपचे नेते आज अति आक्रमक झाले आहेत.
भाजपकडुन राज्यभर आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपकडुन प्रति विधानसभा भरवण्यात आली आहे. या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा कशी घेतली जाऊ शकते, असा सवाल उपस्थीत केला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.
विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचा आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात. त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांनी केली.
त्यानंतर प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्याचे आदेश तालिका अध्यक्षांनी मार्षलांना दिला. मार्षलांनी प्रति विधानसभेतील माईक काढून घेतले. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा यांनी सभागृहात येत राजदंड पळविला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदार रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिला. रवी राणा शेतकऱ्यांबाबतची चर्चा सुरु आहे, तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल, तुमचे म्हणणे मांडायचे असेल तर तुम्ही थांबू शकता, असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी रवी राणांना सांगितले.