सोलापूर : सोलापूर महापालिकेतर्फे कन्ना चौकातील बॉईज हॉस्पिटल येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी ७५ लाखांचा निधी देऊ केला आहे. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र दिले आहे.
जिखाधिकर्यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, आमदार विकास निधी कार्यक्रम सन २०२१-२२ या वर्षाच्या विकासकामांमध्ये महापालिकेच्या हिंगलजमाता बॉईज हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. महापालिकेने या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता माझ्या आमदार निधीतुन सुमारे ७५ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात यावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोविड उपाययोजना करण्यासाठी सद्या महापालिकेला मोठा खर्च करावा लागत आहे. शासन स्तरावरून आलेला निधी कमी पडत आहे. त्यामुळे महापालिकेला मोठया निधीची गरज आहे. हे लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या आमदार निधीतून बॉईज हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांटसाठी ७५ लाखांची निधी दिला आहे.
कोरोना उपचारासाठी शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. यामुळे ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आली आहे. तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन तुटवढ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरात पालिकेच्या कन्ना चौकातील बॉईज कोविड केंद्रात त्या बरोबर होटगी रस्त्यावरील ईएसआय हॉस्पिटल या दोन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्लांटसाठी सुमारे ७५ लाखांचा निधी खर्च अपेक्षित आहे.