ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मनसे आणि सेना आमने- सामने

मुंबईः  मराठी भाषा दिन कार्यक्रमावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आमने- सामने आले आहेत. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो. यंदा मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मनसेने मराठी स्वाक्षरीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी मनसे ठिकठिकाणी मोठे फलक लावणार आहे. नागरिकांनी या ठिकाणी मराठी भाषेत स्वतःची स्वाक्षरी करावी, असे आवाहन मनसेने केले आहे.

मनसे दरवर्षी मराठी भाषा दिनानिमित्त मनसे २७ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करते. यंदाही मनसेने २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रात अमराठी सरकार आहे का? असा सवाल मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातुन केला आहे. मराठी भाषा दिनानिमित्त जाहीर केलेला कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सर्व नियम पाळून होणार, असे अमेय खोपकर यांनी ठणकावून सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!