मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिल रोजी होणार आहे.परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून केली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
यावेळी दोघांमध्ये एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्या संदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात कोणतेही आश्वासन दिले नसले तरी त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे माहिती मिळाली आहे.
गेल्या महिन्यात एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले होते.विरोधी पक्षाने देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.परंतु आता विद्यार्थ्यांची भूमिका बदलली आहे.
त्यामुळे आता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.