आयुष्यात माणूस जन्माला आल्यानंतर
दोन प्रकारच्या गोष्टींमध्ये तुलना होते. तो म्हणजे एक चांगला आणि वाईट. यासाठी प्रत्येक जण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चांगल्यातील चांगले शोधण्याचा आणि ते करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ते प्रत्येकालाच जमते असे नाही.आता हे करत असताना मनात देखील तितकाच स्वच्छ भाव, सकारात्मक विचार, निरपेक्ष वृत्ती, सरळ स्वभाव आणि दुसऱ्याला मोठे करण्याचे मन देखील असावे लागते. आता वरील सर्व वर्णन मी कशासाठी केले, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे. सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक माननीय श्री सुनील शिनखेडे साहेब.
शिनखेडे साहेब,म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले एक ऊर्जा स्थान आणि प्रेरणास्थान. अधिकारी कसा असावा, अधिकाऱ्यांनी काम कसे करावे आणि एखादी गोष्ट चुकीची घडली तरी त्याला योग्य समज देऊन पुन्हा त्याच्या कडून पुन्हा चांगल्या कामाची
अपेक्षा कशी ठेवावी हे त्यांच्या कडून
शिकले पाहिजे.साहेब आकाशवाणीचे
प्रमुख अधिकारी असल्याने कार्यक्रमाचा
दर्जा उंचावत ठेवून त्यांनी कार्यक्रमाची लोकप्रियता वाढवली.
या सर्व त्यांच्या बहू आयामी व्यक्तिमत्त्वामुळे शिनखेडे साहेब कधी सोलापूरकरांचे झाले ते कळलेच नाही. साहेबांना ,प्रचंड अभ्यास आणि कल्पनाशक्ती जबरदस्त असल्याने प्रत्येकाला सामावून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. साधारण दहा ते बारा वर्षापासून मी शिनखेडे साहेबांना जवळून पाहतो. त्यांनी केलेले प्रत्येक कार्यक्रम हे लोकोपयोगी आणि संस्कारशील आहेत.
ते उत्तम कवी,साहित्यिक,वक्ते आणि उत्तम प्रशासक देखील आहेत.विशेष म्हणजे ते स्वतः एक चांगले पत्रकार सुद्धा आहेत. नेहमी सोलापूर दिनांकच्याबाबतीत
विचार करत असताना साहेबांनी उत्कृष्ट सादरीकरण कसे करता येईल,याकडे
लक्ष वेधत आम्हा सर्व सहकाऱ्यांना
मोलाचे मार्गदर्शन केले.त्यामुळे आम्ही घडू शकलो.
खरं तर त्यातूनच हे काम आम्ही करत आहोत. खरं तर या पाठीमागे एक अद्भुत बळ असतं आणि हे बळ खास करून मला सुनील शिनखेडे साहेबांकडून मिळाले. आता हे केवळ मलाच वाटते असे नाही तर आकाशवाणीमधल्या प्रत्येक व्यक्तीला शिनखेडे साहेब आपलेसे वाटतात. अधिकारीसुद्धा दोन प्रकारचे असतात एक प्रोत्साहन देऊन काम करून घेतात आणि दुसरे चांगले काम करूनही नावे ठेवत असतात. असं प्रत्येक क्षेत्रात घडत असते पण शिनखेडे साहेबांकडे पाहिल्यावर त्यांनी प्रत्येकाला योग्य कामाची शाबासकीची थाप देऊन त्यामधील गुणवत्ता बाहेर आणण्याचे काम केलेले आहे. म्हणून आकाशवाणी सोलापूर केंद्राचा दर्जा हा महाराष्ट्रात टिकून आहे. त्याचं सर्व श्रेय शिनखेडे साहेबांना जाते. माझ्यासारखे असंख्य पत्रकार, निवेदक त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत. ‘जुळल्या सुरेल तारा’ हा त्यांचा कार्यक्रम तर अक्षर:शा सोलापूर जिल्ह्यातल्या श्रोत्यांना भुरळ घातला.या माध्यमातून त्यांनी अनेकांची व्यक्तिमत्व उलगडले.या सगळ्यांचे पैलू उलगडताना त्यांचा अभ्यास समोर आला.ते खरोखरच आमच्यासारख्या नवख्या पत्रकारांना प्रेरणादायी आहे.
यात तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांची झालेली मुलाखत सदैव स्मरणात राहील.माणूस कुठल्याही क्षेत्रात काम
करत असताना कुठल्यातरी एका आदर्श व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.
मी आकाशवाणीत काम करत असताना साहेबांची प्रत्येक कृती मी माझ्या डोळ्यासमोर आणून चांगल्यातील चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला बळ देण्याचे काम शिनखेडे साहेबांनी
नेहमी केलेले आहे.
आकाशवाणी असो किंवा अन्य अध्यात्म क्षेत्रात देखील त्यांचे व निरूपणकार स्नेहाताई शिनखेडे यांचे योगदान मोलाचे ठरलेले आहे. सर्वच क्षेत्रात शिनखेडे साहेबांनी कार्यातून आपली गरज निर्माण केली आहे.साहेबांना नुकताच स्व. दत्ता हलसगीकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देखील दिला गेलेला आहे. पण आता साहेबांचे काम हे पुरस्काराच्या पलिकडचे आहे आणि सातत्याने ते करत असतात.
अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी एक आदरयुक्त दरारा प्रत्येकामध्ये निर्माण केलेला आहे तो कधीही विसरता येणार नाही.आकाशवाणीमध्ये काम करत असताना देखील त्यांनी श्रोत्याची गरज, आवडी- निवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रम हा लोकप्रिय झालेला आहे. याचं सर्व श्रेय हे शिनखेडे साहेबांना जाते. साहेबांची निवृत्ती म्हणजे आम्हाला चटका लावणारी गोष्ट आहे.
मनात खूप दुःख आहे,वेदना आहेत.यापुढे आता आम्हाला कोण मार्गदर्शन करणार, तुमच्या सोबत काम करत असताना जे नवीन शिकायला मिळाले,ते कोण देणार.अतिशय अभ्यासपूर्ण आपले बोलणे आणि योग्य वेळी दिलेली कौतुकाची थाप.यामुळे नेहमी आमची प्रगती होत राहिली.
आमचे जीवन समृद्ध करण्यामध्ये आणि आम्हाला संधी देण्यामध्ये आपला मोलाचा वाटा आहे.यात शंका नाही. आपण दिलेल्या संधीमुळे आम्ही आज व्यक्त होऊ शकलो, सादर होऊ शकलो.जरी या माध्यमातून आपण सेवेतून निवृत्त होत असलो तरी आयुष्यभर आमच्या मनामध्ये कायम राहणार आहात.शेवटी असे वाटते की, आपण कायम आकाशवाणीचे अधिकारी असावेत,पण कुठे तरी थांबावे लागते, हा निसर्गाचाच नियम आहे.याचं भान आम्हाला आहे.
आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि उर्वरित आयुष्य आरोग्यदायी जावो, हीच श्री स्वामी समर्थ चरणी आणि श्री दत्त चरणी प्रार्थना !
लेखक –
मारुती बावडे, वृत्त निवेदक
आकाशवाणी सोलापूर
-९९६०१३११७४