मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. मुंबईत कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. ठाण्यातील १६ भागांत कडक लॉकडाऊन केले आहेत. असं असताना आता मुंबईतही कडक निर्बंध करण्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिथे-जिथे केसेस वाढतायत, त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी, इतर निर्बंध लादण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद करण्याची शक्यता पालकमंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केली. कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास मुंबईत अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, अशी माहिती देखील पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.