तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपरिषदेने तयार केला ३६८ कोटी ७१ लाखांचा आराखडा ; संपूर्ण आराखड्याला मंजुरी मिळणे गरजेचे, स्वामी भक्त व अक्कलकोट वासियांची मागणी
अक्कलकोट दि.19 : लाखो भक्तांचे श्रध्दास्थान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी पाहता तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपरिषदेने 368 कोटी 71 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या संपूर्ण रक्कमेला मंजूरी मिळाल्यास गेल्या अनेक वर्षापासून स्वामी भक्त व स्थानिकांनी केेलेल्या मागण्या पूर्ण होणार आहेत. यामध्ये प्राधान्याने पालखी मार्ग व मंदिर, समाधी मठ परिसराचा विकास होणे ही काळाची गरज आहे, हे ओळखून संपूर्ण रक्कमेला मंजूरी मिळणेकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निश्चित यश मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. स्वामीभक्त व स्थानिक यांची सांगड घालून काही कामे आवश्यक आहेत. सन 1995 ला तीर्थक्षेत्र जाहीर झाले. त्यानंतर निधीचा ओघ पाहता राज्यातील अन्य तीर्थक्षेत्राप्रमाणे श्रीक्षेत्र अक्कलकोटला म्हणावा तसा निधी मिळालाच नाही. मात्र आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामुळे अक्कलकोट नगररिषदेकडून 368 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला नुकतीच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता देखील दिलेली आहे.
हा आराखडा आता राज्याचे मुख्य सचिव असलेल्या उच्चाधिकार समितीकडे तो जाणार असून त्यानंतर मंत्र्यांच्या समावेश असलेल्या शिखर समितीकडे हा आराखडा जावून तेथे अंतिम होईल. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची जवळीकता पाहता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ना.फडणवीस यांच्याकडे असल्याचे श्रीक्षेत्र अक्कलकोटचा कायापालट होण्याकामी 368 कोटी 71 लाख रुपयांच्या आराखड्याला मंजूरी निश्चित मिळणार आहे.
एकूण आराखडा पाहता यामध्ये 46 कामांचा समावेश असून यामध्ये व्यापारी संकुलने 9 रु.25 कोटी 70 लाख हे काम झाल्यास अक्कलकोट तीर्थक्षेत्र अतिक्रमणमुक्त होण्यास मदत होणार आहे. विद्युतीकरण 6 कोटी 56 लाख रुपये, उद्याने 4 – 13 कोटी, पाणीपुरवठा व यंत्र खरेदी 2 – 53 कोटी, स्वच्छता गृह बांधणे 9 – 4 कोटी 50 लाख, रस्ते विकास – 214 कोटी यामध्ये बेडर गल्ली ते मैंदर्गी रोड, मुरलीधर मंदिर ते कारंजा चौक पालखी मार्ग, श्री स्वामी समर्थ समाधी मठ ते कारंजा चौक, समाधी मठ ते अळ्ळोळी घर ते श्रीमंत विजयसिंहराजे भोसले चौक तुळजापूर रस्ता, नवी विहीर व्यापारी संकुल ते पंचतालीम, मधला मारुती मार्ग या पालखी मार्ग रस्त्यासाठी भूसंपादन आवश्यक असून त्यासाठी 95 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. हेच काम कळीचा मुद्दा असून हे झाल्यास श्रीक्षेत्र अक्कलकोटमधील गर्दीवर नियंत्रण मिळवून वाहतुक व्यवस्था ही सुरळीत होणार आहे.
सध्या या पालखी मार्गावर सदर रस्ता हा 5 ते काही ठिकाणीच 8 फुट रुंदीचा आहे. या बरोबरच सदर आराखड्यामध्ये रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. भाविकांची गर्दी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिकांची होणारी गैरसोय या सर्व सबबी समोर ठेवून आराखड्यात श्रीक्षेत्र अक्कलकोटातील अंतर्गत रस्त्यांना विशेष करुन पालखी मार्गाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. खरोखरच गरजेचे होते. ते आराखड्यात समाविष्ठ केल्याने आराखड्याचे सर्व स्थरातूून स्वागत होत आहे.
सोलापूर रोड नाका ते हन्नूर रोड व्हाया हसापूर रोड श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, मुरलीधर मंदिर, दक्षिण महाव्दारापर्यंतचा रस्ता बायपास रोड ते वितरण कंपनी कार्यालय, मंगरुळे चौक ते अन्नछत्र मंडळ, मंगरुळे चौक ते कारंजा चौक या चार रस्त्यांसाठी भूसंपादनाची आवश्यकता नसून ह्या रस्त्यांसाठी 119 कोटी रुपयांची मागणी या आराखड्याच्या माध्यातून करण्यात आलेली आहे. वाहनतळाचा विकास, पार्किंगच्या सोयी करिता पाच ठिकाणी व्यवस्था होणार असून याकरिता 43 कोटी 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. खरोखरच गरज ओळखून सदरच्या सुविधेकरिता प्राधान्यक्रम दिल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरात दररोज येणार्या भाविकांची संख्या तसेच वाहनांची संख्या पाहता भूसंपादन व विकास कामासाठी वाहनतळाकरिता अपेक्षित तरतूद म्हणावी लागणार आहे. शहर पाणी पुरवठा योजनेच्या विस्तारीकरणासाठी हालचिंचोळी तलाव, हिळ्ळी बंधारा, सांगवी जलाशय, कुरनूर धरण याकरिता आराखड्यात 50 कोटीची मागणी करण्यात आलेली आहे. कुरनूर ते अक्कलकोट नवी समांतर जलवाहिनी ही सदर आराखड्यात घेण्यात आलेली आहे. मात्र हिळ्ळी येथून शाश्वत पाणीपुरवठा पाहता नवीन जलवाहिनी टाकण्याकामीची तरतूद होणे अपेक्षित असल्याचे शहरवासियांतून बोलले जात आहे. आराखडा हा सर्वंकष विकास कामांना घेवून तयार करण्यात आला. कुरनूर धरण हे संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असून जोपर्यंत एकरुख पूर्ण होवून उजनीचे पाणी धरणात पडल्यास कुरनूर येथून आणखीन एक समांतर जलवाहिनी घेतल्यास हरकत नाही. भविष्याचा विचार करिता कुरनूर धरणातून आराखड्यातील योजना असावीच. या बरोबरच हिळ्ळी जलाशयात बारामाही पाणी उपलब्ध असते. त्यामुळे या योजनेला प्राधान्यक्रम आवश्यक आहे.
याबरोबरच हत्ती तलावाचे सुशोभिकरण, बोटींग व्यवस्था, लेझर शो करणे, एसएसईबी कार्यालयाजवळ समर्थसृष्टी करुन त्या ठिकाणी ध्यान केंद्र, माहिती केंद्र, फूडफोर्ट व कारंजे करणे, स्वामी समर्थ उद्यान व प्रतिलाराजे उद्यान या ठिकाणी नाना-नानी पार्क व खुली जमी यासह इतर कामांसाठी 13 कोटींची मागणी केली आहे.
या बरोबरच इतर कामांसाठी 8 कोटीची मागणी आराखड्याच्या माध्यातून करण्यात आलेली आहे. आराखड्यातील मागण्या त्या पूर्ण होण्याकामी तीर्थक्षेत्र अक्कलकोटला जेवढा आराखडा तेवढी तरतूद होणे काळाची गरज आहे.