मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत बोलताना मागील सत्तर वर्षात कॉंग्रेसने काहीच केले नाही असा पुनरुच्चार केला. यावरु आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मधून एक फोन करा असे म्हणतात, प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदी भाषणात चांगले करतात पण कृती काहीच करत नाहीत, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान काहीही बोलत नाही, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर टीकेचा बाण सोडला.
“कोरोनाच्या काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला. आम्ही कोरोना काळ असल्याने मान्यही केले. मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना हा उपद्व्याप का?,” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.