ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाची पुढची मोहिम : आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका ‘या’ तारखेला होणार !

मुंबई : वृत्तसंस्था

टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर असून, लवकरच आयपीएलच्या रणसंग्रामात मैदानावर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या पुढील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची तारीख आणि ठिकाणही स्पष्ट झाली आहे, ज्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून इतिहास रचला. या सामन्यात पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच प्रयत्नात संघाला विजेतेपद मिळवून दिले.

भारतीय खेळाडू २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मे रोजी होण्याची शक्यता आहे. आयपीएल संपल्यानंतर जूनमध्ये अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून, एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील, पण टी-२० सामना यामध्ये नाही.

आयपीएलनंतर भारतीय खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळेल आणि नंतरच इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका सुरू होईल. ही मालिका तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची असेल. टी-२० मालिकेतील पहिला सामना १ जुलै २०२६ रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवला जाणार आहे. उर्वरित सामने अनुक्रमे ४ जुलै (मँचेस्टर), ७ जुलै (नॉटिंगहॅम), ९ जुलै (ब्रिस्टॉल) आणि ११ जुलै (साऊथॅम्प्टन) या ठिकाणी होणार आहेत.

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला आता आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी करावी लागणार आहे. आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यानंतर संघ पुन्हा टी-२० सामने खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. चाहत्यांसाठी ही मालिका भारतीय संघाच्या सामर्थ्याची आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारीची पहिली झलक ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!