अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात गुरूवारी सर्वत्र कारहुणवी सण साधेपणाने पण उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी कुठेही गर्दी झालेली नव्हती. कुठेही बैलजोड्यांच्या मिरवणुका निघालेल्या नव्हत्या. अतिशय साधेपणाने हा उत्सव पार पडला.
दरवर्षी गावोगावी कर तोडण्याचे कार्यक्रम होत असतात परंतु ते कुठेही यावर्षी होऊ शकले नाहीत. कारण पोलीस प्रशासन तसेच प्रशासनाच्या स्पष्ट सूचना गावपातळीवर होत्या. त्याची अंमलबजावणी पोलीस पाटील यांच्यामार्फत ही करण्यात आलेली होती. तसेच गाव कामगार तलाठी ही याबाबतीत लक्ष ठेवून होते.
मागच्या वर्षभराचा जर विचार केला तर कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक तंगातंगी होती. त्यामुळे बाजार खरेदी करतानाच शेतकऱ्यांनी हात आटोपता घेतला होता. त्यामुळे बाजारात देखील यंदा आर्थिक उलाढाल कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आज मात्र शेतकऱ्यांनी परंपरेप्रमाणे सकाळी बैलाला नैवेद्य दाखवून हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला मात्र जी दरवर्षी गर्दी आणि उत्साह असतो तो फारसा दिसून आला नाही. आर्थिक तंगातंगी आणि कोरोनाचे नियम या दोन्ही कचाट्यात हा सण अडकला होता. अक्कलकोट तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचा तालुका आहे. याठिकाणी कानडी भाषिक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे या काराहूणवी सणाला पूर्वीपासून मोठे महत्त्व आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी पाऊस समाधानकारक असतो त्याचवेळी या सणाचा मोठा उत्साह तालुक्यांमध्ये पाहायला मिळतो. यावर्षी पहिल्या टप्प्यात दोन ते चार दिवस पाऊस पडला नंतर पेरणी वेळी गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यात पावसाविषयी मोठी चर्चा पाहायला मिळाली. तालुक्यातील दुधनी, चपळगाव, मैंदर्गी, जेऊर या भागामध्ये गर्दी न करता आपापल्या शेतामध्ये तर काही ठिकाणी घरी बैलांना आणून पूजा करून पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा केला गेला.