ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही, काँग्रेसच स्पष्टीकरण

मुंबई : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचा जागावाटपाचा फॉर्मुला ठरल्याची चर्चा काँग्रेसनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. असा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. या संदर्भातील बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

‘लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कुठलाही फॉर्मुला ठरलेला नाही. आघाडीच्या कार्यकर्त्यांची व जिल्हाध्यक्षांची एकत्रित बैठक झाली. यापुढच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला. कोण किती जागा लढेल, याबाबत काहीही ठरलेलं नाही. या संदर्भातील बातम्या चुकीच्या आहेत. याचं आम्ही खंडन करतो, असं महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त बैठक बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा फॉर्मुला ठरल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला २१, राष्ट्रवादी काँग्रेसला १९ व काँग्रेसला ८ जागा असं वाटप झाल्याचं बोललं जात होतं. काँग्रेस इतक्या कमी जागांवर तयार कशी झाली याबद्दल त्यामुळं कुजबुज सुरू झाली होती. मात्र, काँग्रेसनंच आता याबाबत खुलासा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!