गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आमदार रोहित पवार यांच्या स्वराज्यध्वज पूजन यात्रेची आज ओझरच्या विघ्नेश्वराचरणी भेट
नाशिक, दि. १० सप्टेंबर, २०२१ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आणि आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा दुसरा दिवस आज नाशिकमधून सुरू झाला. राज्यभरात आज श्रीगणेशाचे आगमन होत आहे. याचे औचित्य साधून स्वराज्य ध्वज यात्रेने आज शुक्रवारी सकाळी राज्याच्या दैवत असणा-या अष्टविनायकांतील एक असलेल्या ओझरच्या श्री विघ्नेश्वराच्या दर्शनाने नाशिक जिल्ह्यातील प्रवासाला प्रारंभ केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, अंकुशराव आमले, गणपतराव कवडे, उपसरपंच विठ्ठल जाधव, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मांडे, अक्षदा मांडे, संगीता टेंभेकर, ओझर देवस्थानचे विश्वस्त रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे, शिलाताई मांडे, दथरथ मांडे, इतर ग्रामस्थ तसेच जुन्नर तालुक्यातील शिवभक्त उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी पेमगिरी किल्ल्याकडे या स्वराज्य ध्वज यात्रेचे प्रस्थान होईल. शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या वास्तव्याने हा किल्ला पुनित झाला आहे. तसेच येथे श्री पेमादेवीचे मंदिरही आहे. सायंकाळी ध्वज यात्रा शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानात येणार आहे.
आमदार रोहित पवार यांनी पुष्पाभिषेकासह ध्वजाचे पूजन करून स्वराज्यध्वज यात्रेचा शुभारंभ काल अहमदनगर येथून केला. नगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे हे मंगल पूजन संपन्न झाले. ध्वज यात्रेच्या पहिल्या दिवशी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला आणि लेण्याद्री देवस्थानालाही भेट दिली.
हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी लोकसहभागातून परंतु कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून हि ध्वज यात्रा पुढील ३७ दिवस प्रवास करणार आहे असं यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितलं.
मानवतेचे आणि भक्ती-शक्तीचे प्रतिक असणारा हा स्वराज्य ध्वज सर्वच जाती-धर्माच्या लोकांसाठी स्फूर्तीदायी आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एक अभिमान वीरपताका म्हणून भगव्या ध्वजाचं महत्त्व उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली संपन्न व अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यावरच स्वराज्यातील अखेरची परंतु विजयी लढाई खेळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने निजामाला मात दिली. या परिसराचे व किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज ठरणार आहे.
भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचेच स्फूर्तीस्थान आणि अभिमान आहे. अत्यंत ऊर्जादायी असा हा भगवा रंग सर्वांसाठीच सहिष्णुतेचा, समानतेचा आणि एकीचा संदेश देणारा आहे. देशाचे भवितव्य असलेल्या युवा शक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा देईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६*६४ फूट असून वजन ९० किलो आहे.
दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील भावना आहे. त्यासाठी ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.
स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल.
कॉल करा- 9696330330