ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ओमायक्रोनमुळे अक्कलकोटमध्ये लसीकरणाचा वेग वाढला !

अक्कलकोट : राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात हर घर दत्तक ही योजना अंमलात आणली आहे. यास अनुसरून अक्कलकोट तालुक्यातील चप्‍पळगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी रात्रंदिवस कोरोनाची लस देण्यासाठी गावोगावी धडपडत आहेत.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाची लस पूर्ण नसेल तर सेवा न देण्याचा आदेश वेगवेगळ्या विभागांना दिला आहे.त्यामुळे लस न घेतलेल्या जनतेची ठिकठिकाणी अडचण निर्माण होत असून यामुळे सर्वजण लस घेण्यासाठी धडपडत आहेत.चपळगाव आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली १८ गावांमधील ३२ हजार ५८७ लोकसंख्या आहे.४ उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरू आहे.

दरम्यान चपळगाव आरोग्य केंद्र अंतर्गतची पहिली लस शंभर टक्के झालेल्या गावांमध्ये हालहळ्ळी अ, दहिटणेवाडी, चपळगाववाडी, बावकरवाडी गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागात संध्याकाळच्यावेळी शेतकरी, मजूर, महिलावर्ग हे निश्चितपणे घरी मिळत असतात. म्हणूनच आरोग्य कर्मचारी दररोज प्रत्येकाच्या घरी जात कोरोनाची लस घेतली का नाही ? याची विचारपूस करीत आहेत. चपळगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी भागातील गावांमध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत आपली सेवा बजावीत आहेत.यामुळे कोरोनाची भीती जनतेतून कमी होताना दिसत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, सरपंच उमेश पाटील, उपसरपंच डॉ. अपर्णा बाणेगाव यांच्यासह आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. काशिनाथ हलकुडे, आरोग्य सहाय्यक परमेश्वर बिराजदार, श्रीधर नडमेटला, एस.एस.माशाळे, विजय कोरे, सिद्धेश्वर चटमुटगे, दशरथ गायकवाड, बाबासाहेब शिरसाट, बी. एम. इनामदार, एल.एस. चंदनशिवे, पडवळ जी. एम, कांबळे, लता म्हेत्रे, आर. आर. सुगंधे, पाटील सिस्टर, एम. जाधव, आशा वर्कर सरोजनी म्हमाणे, मनोज कांबळे, ललिता आगावणे, रंजना सुरवसे, लक्ष्मी कांबळे आदी कर्मचारी प्रयत्न करित आहेत.

पहिली लस ९५ टक्के लोकांना

चपळगाव आरोग्य केंद्राच्या माध्यमातून भागात पहिल्या लसीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून दुसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाणदेखील ५० टक्‍क्‍यांपर्यंत आले आहे. हर घर दत्तक या उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेव्यतिरिक्त लसीसाठी सेवा चोखपणे बजावीत आहेत – परमेश्वर बिराजदार,आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र, चपळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!