समर्थ बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ‘ वाग्यज्ञ ‘ अमृतवक्ते विवेक घळसासी मांडणार महाभारतातील पात्रांची महती
सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दि. 18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवशी सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी हुतात्मा स्मृती मंदिरात वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ निरूपणकार, अमृतवक्ते विवेकजी घळसासी महाभारतातील पात्रांची महती सांगणार आहेत. अशी माहिती समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी दिली.
25 वर्षापुर्वी म्हणजेच दि.25 ऑक्टोबर 1996 रोजी सोलापूरमधील तरूण, तडफदार आणि विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, तज्ञांनी एकत्र येवून सहकारी बँकींग क्षेत्रामध्ये अद्ययावत संगणकीय जलद आणि तत्पर सेवा सोलापूरकरांना मिळावी या उद्देशाने कोजागरी पोर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक यांच्या शुभहस्ते समर्थ बँकेची स्थापना केली. सर्वसामान्यांना समर्थ बँक ही आपली वाटली पाहिजे आणि त्यातून त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे हा उद्देश ठेवून बँकेची वाटचाल सुरू झाली. अर्थ करी समर्थ हे ब्रीद घेवून सुरू करण्यात आलेल्या समर्थ बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी बचत, चालू, कर्ज खाते तसेच आवर्तक व मुदत ठेवीच्या विविध योजना सुरू झाल्या. सोलापूर मधील सहकारी बँकेच्या क्षेत्रात ऑटोमायजेशन व डिजिटलायजेशन सुरू करणारी समर्थ बँक ही पहिली ठरली. अत्यल्प शुल्कामध्ये बदलत्या युगासोबत अत्याधुनिक सेवा ग्राहकांना देण्यात येत आहेत. सहकार विभाग, रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी योग्य पावले उचलून बँकेच्या कार्यपध्दतीमध्ये सुयोग्य बदल करण्यात आले. याचा जास्तीत जास्त लाभ ग्राहक सेवेवर सकारात्मक झाला. आधुनिक युगातील बँकींग क्षेत्रानुसार समर्थ बँकेने एटीएम,सीबीएस,एनीवेअर बँकींग तसेच रुपे डेबिट, क्रेडिट कार्ड, फॉरेक्स सेवा, बीबीपीएस, एसएमएस बँकींग अशा सुविधाही सहज आणि सुरक्षितरित्या उपलब्ध करून दिल्या.
समर्थ बँकेला आतापर्यत बँको,बँकींग फ्रंटीयर्स,सहकार भारती, मुंबई को ऑप बँक असोसिएशन अशा मान्यताप्राप्त संस्थाकडून पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. अनेक सुविधा बँकींग क्षेत्रात प्रथम देवून ग्राहकांची गरज पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, ग्राहक हेच दैवत मानून कोरोना काळातही अविरतपणे सेवा देवून बँकेने प्रगती साधली आहे. म्हणूनच सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर यासह संपूर्ण राज्यातील विविध ठिकाणी जलद आणि तत्पर ग्राहक सेवा देण्यात येत आहे. गेल्या पंचवीस वर्षात बँकेने चांगली प्रगती केली आहे त्याचे श्रेय सर्व संचालक, कर्मचारी, ग्राहक आणि हितचिंतक यांना जाते. केवळ बँकींगवर भर देता सामाजिक दायित्व म्हणूनच ग्राहकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन समर्थ बँकेच्या वतीने आयोजित करण्यात येतात त्याचाच भाग म्हणून यंदा समर्थ बँकेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांच्या अमृतवाणीतून दि.18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवशी सायंकाळी 6.25 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाभारतामधील काही पात्रांवर वाग्यज्ञ होणार आहे. पहिल्या दिवशी सोमवार दि. 18 ऑक्टोबर रोजी नरोत्तम पार्थ, दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. 19 ऑक्टोबर रोजी पितामह भीष्म, तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी बुधवार दि. 20 ऑक्टोबर रोजी महानायक श्रीकृष्ण अशा तीन दिवस तीन महान व्यक्तीरेखांवर वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले असल्याचे बँकेचे संचालक तथा पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने देण्यात आलेले सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे तसेच हुतात्मा स्मृती मंदिर मधील 50 टक्के आसन क्षमतेमध्येच हा कार्यक्रम होणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी रसिक श्रोत्यांना घरबसल्या हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून सोशल मिडियाच्या माध्यमातून समर्थ बँकेच्या आणि वृत्तवेध चॅनलच्या फेसबुक वरून ऑनलाईनपध्दीने थेट प्रक्षेपणही होणार आहे. कार्यक्रम हा वेळेवर सुरू होणार असल्याने रसिकश्रोत्यांनी कार्यक्रमाच्या 15 मिनिटे आधीच स्थानापन्न व्हावे आणि कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत असे आवाहनही यावेळी बँकेचे अध्यक्ष आणि सर्व संचालकांनी केले आहे.